पुरंदर रिपोर्टर Live
बारामती, दि. ४ जून
बारामती शहरात वाहतूक शाखेने काळ्या काचा लावलेल्या वाहनांवर धडक मोहीम राबवत अवघ्या १५ दिवसांत १५२ चारचाकी वाहनांवर थेट कारवाई केली असून, ९ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. स्कॉर्पिओ, थार, फॉर्च्यूनर, स्विफ्ट, अल्टोपासून वेर्ना पर्यंतच्या अनेक वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींचा पर्दाफाश होऊ लागला असून, तपासादरम्यान तडीपार व गंभीर गुन्हेगारांचा शोध लागल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी काळ्या काचा उतरवून संबंधित वाहनं डिटेन केली आहेत.
वाहनचालकांकडून वारंवार नियम तोडल्याने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आता अधिक आक्रमक करण्यात आली आहे. कोर्ट कॉर्नर चौक, कसबा चौक परिसरात तपासणी अधिक तीव्र करण्यात आली असून, वाहनांची नंबर प्लेट लपवणे, लहान नंबर लिहिणे यासारख्या प्रकारांवरही कडक कारवाई केली जात आहे.
पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, गाडीच्या काचांबाबत शंका असल्यास ९९२३६३०६५२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
“टुकारांवरही पोलिसांचा दंडात्मक चाप”
या मोहिमेंतर्गत १ जानेवारीपासून २८१ काळ्या काचा आणि ९८५ नंबर प्लेटशी संबंधित नियमभंगांवर कारवाई करण्यात आली आहे. काही गुन्हेगारी स्वरूपाच्या चालकांकडून आणि टुकार मुलांकडून जागीच दंड वसूल करून काही वाहने डिटेन करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक सुभाष काळे व त्यांच्या टीमसह शीघ्र कृती दलाचे जवान सहभागी होते.
ही मोहीम कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत असून, काळ्या काचा वापरणाऱ्यांना पोलिसांचा स्पष्ट संदेश मिळाला आहे — कायदा तोडल्यास शिक्षा निश्चित आहे!
0 Comments